५) प्रेरणा गीत
द्या हो गुरूजी पुस्तक,वाचून दाखवतो खडखडा
कागद फाडून चेंडू केले,
वास,रंग,चव ओळखू आले
ध्वनी डबीतील चुकलो नाही
वर्णन, गप्पा, संवाद झाले
अशा 'गुरु'ची वाट झाडतो
हाती घेऊन फडा
द्या हो गुरूजी पुस्तक,वाचून
दाखवतो खडखडा. ॥१॥
पूर्वी वाचन चुकत होतो,
काना मात्रा हुकत होतो
गुरुजींच्याही 'शाब्बास'किला
नेहमी नेहमी मुकत होतो
कृती करुनी हुशार झालो
भरलाय ज्ञानाचा घडा
द्या हो गुरूजी पुस्तक,वाचून
दाखवतो खडखडा. ॥२॥
गप्पा,गोष्टी,गाणी,कोडी
साम्य-भेद चित्रांची गाडी
बसल्या बसल्या जोडू शकतो
समान अक्षरांची जोडी
'व' चे शब्द सांगू का मी?
लिहा फळ्यावर 'वडा'
द्या हो गुरूजी पुस्तक,वाचून
दाखवतो खडखडा. ॥३॥
'वाचन पाठ' मी वाचू शकतो
गाणी म्हणत नाचू शकतो
वाचन धेयापर्यंत आता,
न थांबता मी पोहचू शकतो
येऊ द्या साहेब,घेऊ द्या पुस्तक,
देऊ द्या कुठलाही धडा
द्या हो गुरूजी पुस्तक,वाचून
दाखवतो खडखडा. ॥४॥