गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार
अन् वज्रांचे छातीवरती घ्या झेलून प्रहार ||धृ||
श्वासांनो, जा वायुसंगे ओलांडुन भिंत
अन् आईला कळवा अमुच्या हृदयांतिल खंत
सांगा "वेडी तुझी मुले ही या अंधारात
बद्ध करांनी अखेरचा तुज करिती प्रणिपात
तुझ्या मुक्तिचे एकच होते वेड परी अनिवार
त्यांना वेड परी अनिवार ||१||
कशास आई, भिजविसि डोळे उजळ तुझे भाल
रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषःकाल
सरणावरती आज आमुची पेटतात प्रेते
उठतिल त्या ज्वालांतुन भावी क्रांतीचे नेते
लोहदंड तव पायांमधले खळखळा तुटणार
आई, खळाखळा तुटणार ||२||
आता कर ओंकारा तांडव गिळावया घास
नाचत गर्जत टाक बळींच्या गळ्यांवरी फास
रक्तमांस लुटण्यास गिधाडे येउ देत क्रूर
पहा मोकळे केले आता त्यासाठी ऊर
शरिरांचा कर सुखेनैव या, सुखेनैव संहार
मरणा, सुखनैव संहार ||३||