सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना ||धृ||
दु:खितांचे दु:ख जावो ही मनाची कामना
वेदना जाणावयाला जागवू संवेदना
दुर्बलांच्या रक्षणाला पौरूषाची साधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना ||१||
जीवनी नवतेज राहो अंतरंगी भावना
सुंदराचा वेध लागो मानवाच्या जीवना
शौर्य लाभो, धैर्य लाभो, सत्यता संशोधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना ||२||
भेद सारे मावळू द्या वैर सार्या वासना
मानवांच्या एकतेची पूर्ण होवो कल्पना
मुक्त आम्ही फक्त मानू बंधुतेच्या बंधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना ||३||